Saturday, April 16, 2011

ब्रह्मराक्षस . Stop Female Foeticide.. स्त्री भ्रूण हत्या कमी व्हावी या साठी केला थोडा प्रयत्न..

स्त्री भृणहत्या करण्यासाठी
उद्युक्त मने होती कैसी??
स्त्री जन्म उद्ध्वस्त करण्यासाठी
जनमान्यता ही मिळते कैसी??॥१॥

स्त्री उदरस्थित जन्म घेती
स्त्री-पुरुष दोन्ही जाती ॥
स्त्री उदरा खेरीज जाती
लयासी स्त्री-पुरुष जाती ॥२॥

नवमास बालक वाढवी माता
प्राण कंठगत आणून कशी
तेव्हा महत प्रयत्नातुनी अंता
जीव अवतरतो जन्मून जगी॥३॥

मुलगी जन्मास येता घरी ।
आठवा माता लक्ष्मी सरस्वती ॥
आठवाल जिजाऊ यशोदा जरी ।
शूर ज्ञानी जन्मती पुढती ॥४॥

कन्या परधन कल्पना आता ।
टाकुनी द्या मनातुनी ॥
कन्या हेची स्वधन आता ।
माना तिला मनापासुनी ॥५॥

माता पिता बंधू भगिनींचे ।
वात्सल्य मनी जपते ती ॥
असेल जरी श्वशुर गृही ।
हृदयस्थ माहेरी असते जी ॥६॥

माहेर हे सुखात असता ।
श्वशुरी आनंदी असते ती ॥
 माहेर हे दुखात असता ।
लपुनी छपुनी रडते ती ॥७॥

माता पिता बंधू भगिनींसाठी ।
लपुनी व्रत-उपवास करते ती ॥
माहेरच्या सुख शांती साठी ।
तिळ तिळ आतून तुटते ती ॥८॥

माहेरच्या व्यथा पोटात ठेवुनी ।
ओठात हसू आणते ती॥
प्रसन्न चेहरा खुलत ठेवुनी ।
श्वशुरी सर्वा सांभाळते ती॥९ ॥

चंदना परी श्वशुर गृही ।
सर्वांसाठी ती झिजते ॥
कष्ट खस्ता त्रास साहुनी ।
मर्जी सर्वांची ती सांभाळते॥१० ॥

तिच्या मनाची तुलना आता।
कुठल्या धनाशी होईल का??॥
कुबेराचे धन कोठार आता ।
तिच्या मनाशी तोलेल का??॥११ ॥

हुंडा,वरदक्षिणा,मानपान प्रथा।
जाळूनी टाकू प्रत्यक्षात आता॥
स्त्री मनाची ओळखुनी महानता।
स्त्रीभ्रूण हत्या  विचार जाळू आता ॥१२ ॥

कन्या भगिनी वहिनी माता।
स्वरूपे स्मरा परस्त्रीची साचा॥
स्त्रीभ्रूण हत्या कोणी करेल आता।
ब्रह्मराक्षस होईल अनेक जन्मीचा ॥१३ ॥

                           -कवी चारुदत्त

No comments:

Post a Comment